लातूर /
अंबादास करकरे
दिनांक 11 सप्टेंबर रोजी तक्रारदार रत्नदीप सुभाष सोनकांबळे यांने त्याची पैशाची बॅग कोणीतरी अज्ञात आरोपीने हिसकावून घेऊन गेल्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे शिवाजीनगरचे असे दोन पथक तयार करून पैशाची बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे, राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव. यास दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो व सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि त्याचे इतर दोघे साथीदारांनी गुन्ह्यातील फिर्यादी रत्नदीप सुभाष सोनकांबळे याला त्याच्या मुंबई येथील मित्राने पाठवलेले पैशाची बॅग चोरली गेल्याची बनाव करून सदरचे पैसे हडपण्याचा कट रचल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील फिर्यादी रत्नदीप सुभाष सोनकांबळे,वय 20 वर्ष, राहणार मीननगर, उमरगा जिल्हा धाराशिव. यास ताब्यात घेऊन त्याने एका हॉटेलच्या रूममध्ये बॅग चोरीचा बनाव करून चोरून व लपवून ठेवलेले 09 लाख 50 हजार रुपयाची रोख रक्कमची बॅग जप्त करण्यात आली आहे.
एकंदरीत नमूद गुन्ह्यातील फिर्यादीनेच त्याच्या मित्राने पाठवलेले पैसे हडप करण्यासाठी इतर साथीदारासोबत मिळून बॅग चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे, वय वीस वर्ष राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव, रत्नदीप सुभाष सोनकांबळे, वय 20 वर्ष, राहणार मीननगर, उमरगा जिल्हा धाराशिव, विजय गायकवाड, राहणार लातूर (फरार) सुरज कदम, राहणार लातूर (फरार) असे असून अनुक्रमांक एक व दोन यांना 09 लाख 50 हजार रुपयाच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा पथकामार्फत शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार राजेश कंचे, युवराज गिरी, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, मुन्ना मदने, जमीर शेख, गणेश साठे, वेंकट निटुरे, शैलेश सुडे, हरी पतंगे, तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस अंमलदार बालाजी कोतवाड, रणजीत शिंदे, काकासाहेब बोचरे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments