लातूर/ अंबादास करकरे
लातूर, दि. 25 : राज्याचे महसूल तथा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज रेणापूर व लातूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची, तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुमारे दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतपिकांची पाहणी केली. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रेणापूर तालुक्यातील मोरवड, मोटेगाव, भोकरंबा, पोहरेगाव आणि आरजखेडा येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसान पाहणी प्रसंगी औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रशांत थोरात, गट विकास अधिकारी सुमित जाधव, ॲड. बळवंतराव जाधव, सचिन दानी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच लातूर तालुक्यातील साखरा, मांजरी व मुरूड अकोला येथील पाहणी प्रसंगी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले आदी उपस्थित होते.
मांजरा नदीच्या पुरामुळे वाहून आलेल्या गाळाचा चिखल तुडवत, कधी ट्रॅक्टरमध्ये बसून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत महसूल राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. तीन तीन दिवस पुराच्या पाण्यात राहिलेल्या सोयाबीन, रेशीम आणि ऊस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. कदम यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा सर्व्हे करावा. पुरामुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल, शिवरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेणापूर तालुक्यातील आरजखेडा येथे शेतातच झाडाखाली बसून शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Post a Comment
0 Comments