अंबादास करकरे
लातूर: अवैध दारू विक्री आणि वाहतूक यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिले असून त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे साहेबराव हाके आणि अर्जुन राजपूत यांनी वाढवणा पाटीजवळ सापळा रचून देशी दारूच्या ५७६ बाटल्या अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले आहे.
वाढवणा पाटीजवळ किनी यल्लादेवी यामार्गे अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती साहेबराव हाके आणि अर्जुन राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून एका मारुती अल्टो कारचा पाठलाग करून या वाहनाची झडती घेतली असता ५७६ देशी दारूच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करण्यासाठी नेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी राजेंद्र व्यंकट सूर्यवंशी रा. रोहिणा, ता. चाकुर यास ताब्यात घेतले तर वाहनात असलेला दुसरा आरोपी शाम सरवने रा. रोहिणा ता. चाकुर हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला आहे. एकूण ५७६ बाटल्या अंदाजे रक्कम ४६०००/-, तर वाहतूक करणारे वाहन रक्कम १०००००/- पोलिसांनी जप्त केले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई),८१,८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेबराव हाके आणि अर्जुन राजपूत या दोघांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments