लातूर, जिल्ह्यात हरीत क्षेत्राचे प्रमाण अतिशय कमी असून सर्वात कमी वृक्ष असलेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश होतो. त्यामुळे जिल्ह्यात व्यापक स्वरुपात वृक्ष लागवड मोहीम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या लातूर दौऱ्यात दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांच्या सहभागातून सलग वर्षभर व्यापक वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा ‘मेगा ड्राईव्ह’ हाती घेण्यात आला. या अंतर्गत लातूर येथील कृषि महाविद्यालयाच्या दीड हेक्टर क्षेत्रावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत घनवन वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत ४५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संगीता टकले, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार सौदागर तांदळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, सहायक वनसंरक्षक मदन क्षीरसागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्याला हरीत जिल्हा बनविण्यासाठी शासन, प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्था, नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वृक्ष लागवड मोहिमेत लावलेले प्रत्येक झाड जगले पाहिजे, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यामुळे वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धनाची मोहीमही तितक्याच ताकदीने राबविण्यात यावी. सर्वच शासकीय विभागांच्या सक्रीय सहभागासोबतच जिल्ह्यात पर्यावरण, वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेवून पुढील वर्षभरात वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत कृती आराखडा वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. यासाठी कृषि महाविद्यालयाने तांत्रिक सहकार्य करावे, असे त्यांनी सांगतिले.
प्रारंभी वृक्षदिंडीने वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात झाली. पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी या वृक्षदिंडीत सहभागी झाले होते. पालकमंत्री श्री. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना, पोलीस अधीक्षक श्री. तांबे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ढवण यांच्या नावाचे झाड लावून वृक्षारोपणाला प्रारंभ झाला. कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.



Post a Comment
0 Comments