लातूर /
अंबादास करकरे
लातूर- चाकूर तालुक्यातील हणमंतवाडी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे उभारली जाणार आहेत. या वसतिगृहांमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळतील आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
हणमंतवाडी येथे या वसतिगृह इमारतींचे भूमिपूजन सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके, शिवाजी काळे, गोपाळ माने, विलास पाटील चाकूरकर, सिद्धेश्वर पवार, मिलिंद महालिंगे यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दोनमजली वसतिगृह इमारतींसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये निवास, भोजन कक्ष, अद्ययावत ग्रंथालय आणि अभ्यासिका यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. चाकूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमुळे शिक्षणाची उत्तम संधी मिळेल. जागेच्या अभावामुळे बांधकामास विलंब झाला असला, तरी आता लवकरच सर्व सोयींनी युक्त वसतिगृहे उभारली जाणार आहेत. या इमारतींचे बांधकाम दर्जेदार व्हावे, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मिलिंद महालिंगे, गोपाळ माने, सिद्धेश्वर पवार आणि विलास पाटील चाकूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments