लातूर /अंबादास करकरे
लातूर- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2025-26 या सत्रासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून 37 जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये यांत्रिक मोटारगाडी (21 जागा), मोटारगाडी साठा जोडारी (7 जागा), ऑटो इलेक्ट्रीकल तथा इलेक्ट्रिशियन (3 जागा), सांधाता-वेल्डर (1 जागा), रंगकामगार (16 जागा) आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनर (2 जागा) या व्यावसायिक पदांचा समावेश आहे.
पात्र उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण, आय.टी.आय. (एनसीव्हीटी) किंवा विविध व्यवसायात व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. यांत्रिक प्रवर्गातील अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारकांसाठी 2 जागा राखीव आहेत. आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर, तर अभियांत्रिकी पदवीधरांनी www.nats.education.gov.in या पोर्टलवर 11 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर विभागाच्या आस्थापना क्रमांक (EO1172700461) साठी अर्ज करावा.
ऑनलाइन नोंदणीनंतर, उमेदवारांनी लातूर विभागीय कार्यालय येथे 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत छापील अर्ज सादर करावेत. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे, जे धनाकर्ष किंवा आय.पी.ओ.द्वारे सादर करावे. अर्ज कार्यालयात शनिवार व सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील. 20 सप्टेंबर 2025 नंतर ऑनलाइन नोंदणी केलेले अर्ज रद्द होतील. 27 सप्टेंबर 2025 (दुपारी 3 वाजेपर्यंत) छापील अर्ज सादर न केल्यास उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही. यापूर्वी शिकाऊ उमेदवारी केलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबेजोगाई रोड, लातूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments