अंबादास करकरे
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीचे तसेच बीओटी तत्वावरील गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात भाडे थकीत असल्याच्या पार्श्वभूमीवर गाळेधारकांना दिलासा देत मनपाने मोठा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक महसूल वसूल व्हावा आणि थकबाकीदारांना भरणा करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून दि. 8 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत व्याजात 100% सूट जाहीर करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी मीना यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे पाटील यांच्या नियोजनात ही योजना राबविण्यात येणार आहे. या सूट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने सर्व गाळेधारकांना केले आहे.
गाळेधारकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
गाळेधारकांकडून गेल्या काही काळापासून व्याजमाफीची मागणी केली जात होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना यांनी व्याजसूट योजनेला मंजुरी दिली. थकित भाड्याचा मोठा बोजा कमी करून भरणा सुलभ करण्याच्या उद्देशाने ही संधी उपलब्ध करून दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
31 डिसेंबरपर्यंत एकरकमी भरणा करण्याचे आवाहन
ज्या गाळेधारकांकडे भाड्याची थकबाकी आहे, त्यांनी एकरकमी भरणा करून व्याजमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे पाटील यांनी केले आहे.भरणा न करणाऱ्या गाळेधारकांवर पुढील काळात कठोर कारवाई करण्याची मनपा प्रशासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनपाच्या या निर्णयामुळे गाळेधारकांना तर दिलासा मिळणारच आहे, शिवाय महानगरपालिकेच्या महसूलवाढीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments