अंबादास करकरे
लातूर, दि. 07 डिसेंबर 2025 :
लातूर तसेच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेचा अखेर लातूर पोलिसांनी वेध घेतला असून, आंतरजिल्हा सराईत टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तब्बल 23 गंभीर घरफोड्या उघडकीस आणत पोलिसांनी ₹4,37,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लातूर–बार्शी रोडवर सापळा 06 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लातूर–बार्शी रोडवरील विमानतळ टी-पॉइंट येथे संशयित हालचाल असल्याचे कळताच पथकाने तातडीने सापळा लावला. दोन मोटारसायकलींसह चार संशयितांना 14.00 वाजता ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींची नावे –1. अजय श्रावण शिंदे (22, रा. सुंभा, जि. धाराशिव) 2. अर्जुन दिलीप भोसले (27, रा. भिवंडी/झरेगाव, जि. सोलापूर) 3. केशव माणिक पवार (30, रा. खंडाळा, ता. तुळजापूर) 4. विक्की सजगु–या शिंदे (19, रा. सुंभा, जि. धाराशिव)
सोन्या–नगदीसह चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त अंगझडतीदरम्यान आरोपींकडे सोन्याच्या 3 अंगठ्या, 1 गंठण, कानातील फुले व ₹32,000 रोख मिळाले.
तसेच गुन्ह्यात वापरलेल्या ₹1,30,000/- किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली — हिरो होंडा स्प्लेंडर (MH 25 BG 1368) व टीव्हीएस अपाची (MH 25 BF 1382) जप्त करण्यात आल्या.
आरोपींची कबुली — 23 घरफोड्या उघड
सखोल चौकशीत आरोपींनी कबुली देत सांगितले की, ते अन्य तीन साथीदारांसह लातूर, धाराशिव, बिदर जिल्ह्यातील एकूण 23 घरफोड्यांमध्ये सामील आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे –
लातूर जिल्हा : 18 घरफोड्या (औसा, किल्लारी, मुरुड, रेणापूर, कासारशिरसी, लातूर ग्रामीण, गातेगाव, भादा आदी ठिकाणी) इतर जिल्हे : 5 गंभीर चोरीचे गुन्हे (उमरगा, धाराशिव ग्रामीण, मंटाळा, मुडबी – बिदर) या टोळीविरुद्ध धाराशिव जिल्ह्यात 57 गुन्हे नोंद असल्याचेही उघड झाले आहे.
एकूण मुद्देमाल — ₹4,37,000/-
सोन्याचे दागिने : ₹2,75,000/-
रोख रक्कम : ₹32,000/-
मोटारसायकली : ₹1,30,000/-
एकूण : ₹4,37,000/-
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या पथकाने ही मोहीम राबवली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
लातूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा घरफोडीची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित 112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments