Type Here to Get Search Results !

लातूर तहसील कार्यालयातील मूलभूत सुविधांचा अभाव; नागरिकांचा सवाल — “तहसीलदार लक्ष देणार का?”



अंबादास करकरे 

लातूर : लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक नागरिकांची वर्दळ असलेले कार्यालय म्हणून लातूर तहसील कार्यालय ओळखले जाते. रोज शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध कामांसाठी आलेले अर्जदार या ठिकाणी ये-जा करतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असूनही मूलभूत सोयींचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शौचालयाचा अभाव – नागरिकांची प्रचंड गैरसोय

तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठीच नव्हे तर स्वतः कर्मचाऱ्यांसाठीही शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. दिवसभर विविध कामांसाठी रांगेत थांबणाऱ्या महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.शौचालय नसल्याने नागरिकांना पंचायत समितीच्या शौचालयांवर अवलंबून राहावे लागते, जे अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तहसील कार्यालयातच शौचालय नसेल, तर प्रशासनाने सुविधा देण्याबाबत नेमकी भूमिका काय आहे?”

विकलांग (अपंग) नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधाही नाही

तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रे, महसुली कामांसाठी मोठ्या संख्येने अपंग (विकलांग) व्यक्ती येतात. मात्र कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पावसात, उन्हात आणि गर्दीत मोठी कसरत करून कार्यालयात प्रवेश करावा लागतो. अपंगांसाठी रॅम्प किंवा सहाय्यक सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याने त्यांच्या प्रती “सुगम कार्यालय” या संकल्पनेलाच तडा जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचा सवाल — तहसीलदार लक्ष देणार का?

या मूलभूत गैरसोयींमुळे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन तहसीलदार यांनी या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार?” स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तहसील कार्यालयात येणारे अर्जदार यांची एकच मागणी आहे —

शौचालय, व्हीलचेअर आणि मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, जेणेकरून सर्वसामान्यांना योग्य सुविधा मिळतील आणि सरकारी कार्यालयाप्रती विश्वास वाढेल.

Post a Comment

0 Comments