लातूर/अंबादास करकरे
राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ आणि देवणी या सर्व दहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेसह संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशीपासून १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. २२ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर २३, २४ आणि २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० नंतर निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येऊन त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व कायदेशीररित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर–घुगे यांनी या संदर्भात नियुक्त सर्व नोडल अधिकारी व संबंधित विभागांची आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनावर कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments