Type Here to Get Search Results !

डुप्लीकेट सोन्याच्या बिस्किटांद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५ आरोपी अटकेत, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!



लातूर / अंबादास करकरे 

डुप्लीकेट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे सामान्य नागरिकांची फसवणूक करून खरे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडप करणाऱ्या एका अत्यंत संघटित व चलाख आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव हा अद्याप फरार आहे. अटक आरोपींकडून सुमारे ९,०१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मागील काही महिन्यांपासून ही टोळी डुप्लीकेट सोन्याचे बिस्किट, अंगठ्या व इतर दागिने तयार करून ते खरे सोने असल्याचा भास निर्माण करत नागरिकांची फसवणूक करीत होती. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक तसेच एकटे प्रवास करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करून “स्वस्तात सोने मिळत आहे” किंवा “रस्त्यावर सापडलेले सोने आहे” अशा आमिषाने ही टोळी आपला गुन्हेगारी उद्योग चालवत होती. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने या टोळीचा शोध सुरू केला होता.

दिनांक १३ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, गरुड चौक ते राजीव गांधी चौक रिंग रोडवरील सिंकंदरपूर रस्त्यावर टाटा इंडीगो कार व होंडा अ‍ॅक्टिवा स्कूटीसह काही इसम डुप्लीकेट सोन्याचे बिस्किट विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत थांबले आहेत. माहितीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजता सापळा रचून पाच इसमांना ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपींची नावे : अभिमान राजेंद्र कांबळे (वय २५), रा. तुपडी, ता. निलंगा, धनंजय बालाजी गायकवाड (वय २८), रा. दगडवाडी, लातूर, बालाजी प्रशांत कांबळे (वय २२), रा. तुपडी, ता. निलंगा, बालाजी विठ्ठल गायकवाड (वय ५४), रा. भातखेडा, लातूर, सचिन बालाजी गायकवाड (वय २८), रा. मेघराज नगर, शाहू चौक, लातूर

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून ४२ ग्रॅम खरे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, डुप्लीकेट सोन्याचे १६ बिस्किटे, डुप्लीकेट अंगठ्या ३, टाटा इंडीगो कार (MH 23 Y 9222) व होंडा अ‍ॅक्टिवा स्कूटी (MH 24 BZ 9308) असा एकूण ९,०१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपींनी कबुली दिली की, टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव (रा. सलगरा, ता. जि. लातूर; सध्या जठाळ कॉलनी, लातूर) व आरोपी सचिन बालाजी गायकवाड हे सोनार व्यावसायिक असून ते डुप्लीकेट सोन्याचे बिस्किट व दागिने तयार करून देत होते. इतर आरोपी हे दागिने वापरून नागरिकांची फसवणूक करत आणि मिळालेला सर्व मुद्देमाल संदीप जाधवकडे सुपूर्द केला जात असे.

पोलीस तपासात तसेच अभिलेख तपासणीत उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर ग्रामीण व चाकूर पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) अंतर्गत दाखल गुन्ह्यांशी या टोळीचा थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपींनी धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यांतही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक आरोपींना पोलीस ठाणे उदगीर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपी संदीप जाधवचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, प्रमोद देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी असून फसवणूक व आर्थिक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलीस प्रशासन किती सतर्क व कठोर आहे याचे उत्तम उदाहरण आहे.

लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करतात की, रस्त्यावर किंवा अनोळखी व्यक्तीकडून “स्वस्तात सोने मिळते” अशा आमिषाला बळी पडू नये. संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. लातूर पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असून भविष्यातही अशा संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments