Type Here to Get Search Results !

*काय म्हणतंय लातूर? या प्रश्नाला लातूरकरांनी दिले जोरदार उत्तर


लातूर / अंबादास करकरे 

लातूर शहरात काँग्रेस-वंचित आघाडीला मिळालेले स्पष्ट बहुमत हे केवळ काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचे प्रतीक नसून, भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी, मतभेद, आयत्या वेळी घेण्यात आलेले चुकीचे राजकीय निर्णय आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली तीव्र नाराजी याचा थेट परिणाम असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूर दौऱ्यात केलेले चीड निर्माण करणारे वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या संघटनात्मक फेरबदलांमुळे पक्षांतर्गत असंतोष अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. विशेषतः अर्चना पाटील चाकूरकर यांची लातूर शहर निवडणूक प्रमूख पदावरून हकालपट्टी करून ते पद स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतल्यामुळे भाजपला मोठा राजकीय फटका बसल्याची चर्चा आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, भाजपच्या शहर संघटनामध्ये बदल करताना अनेक जुने, निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते डावलले गेल्याचा आरोप पक्षातीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेषतः अर्चना पाटील चाकूरकर यांच्याशी निष्ठावंत असलेले अनेक कार्यकर्ते संघटनात्मक प्रक्रियेतून दूर झाले. याचा परिणाम प्रचार, बूथ व्यवस्थापन आणि मतदानाच्या दिवशी स्पष्टपणे दिसून आला. राजकीय जाणकारांच्या मते, संघटनेतील अंतर्गत विसंवाद, नेतृत्वातील एकाधिकार वृत्ती आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय यामुळे भाजपची लातूर शहरातील पकड सैल झाली.

*संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह-*

भाजपमधील अंतर्गत नाराजीला माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निर्णयांची धार अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. संघटनात्मक पदे स्वतःकडे केंद्रीत ठेवणे, काही गटांना प्राधान्य देणे आणि दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांना डावलणे यामुळे पक्षांतर्गत फूट वाढल्याचा आरोप होत आहे. याचाच फायदा विरोधकांनी घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

*काँग्रेस–वंचित आघाडीचा दुहेरी फायदा*

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून सामाजिक व राजकीय समीकरणे अचूक जुळवली. या युतीमुळे मतांचे विभाजन टळले आणि अल्पमतातील मते एकत्र येत काँग्रेसच्या पारड्यात निर्णायक बहुमत पडले.

*अमित देशमुख यांना राजकीय संजीवनी*

या सर्व घडामोडींचा सर्वाधिक फायदा माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांना झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भाजपमधील अंतर्गत कलह, नाराज कार्यकर्त्यांची निष्क्रियता, निवडणूक प्रक्रियेतील उदासीनता आणि काँग्रेस–वंचित आघाडी यामुळे काँग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले.

*भाजपसाठी आत्मपरीक्षणाची गरज*

लातूर शहरातील निकालानंतर भाजपमध्ये आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. संघटनात्मक निर्णय घेताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास, स्थानिक नेतृत्वाला महत्त्व आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया या बाबी दुर्लक्षित केल्यास भविष्यातही भाजपला अशाच राजकीय धक्क्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments