Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या कष्टांचे संरक्षण : लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई, सोयाबीन चोरी प्रकरण उघड; तीन आरोपी अटकेत, ₹1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त.


लातूर / अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) प्रभावी कारवाई करत सोयाबीन चोरीचे मोठे प्रकरण उघडकीस आणले आहे. निलंगा पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ₹1,38,400/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पिकअप वाहनासह एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

लातूर जिल्ह्यात शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतमाल चोरीसारख्या गुन्ह्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्यावर अन्याय होतो. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक मालमत्तेच्या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

संशयास्पद हालचालींवर नजर; पाठलाग करून आरोपी अटकेत

दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास, निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतील पानचिंचोलीपाटी परिसरात, हणुमंतवाडी ते निलंगा रोडवरील मसलगा शेत शिवारात 4 ते 5 इसम सोयाबीनचे कट्टे चोरट्या पद्धतीने पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात भरत असल्याची माहिती LCB पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाची चाहूल लागताच संशयित आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून तीन इसमांना ताब्यात घेतले, तर एक आरोपी पिकअप वाहनासह फरार होण्यात यशस्वी झाला.nअटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :दिपक तानाजी पवार (वय 27), नवनाथ छगण उर्फ अचित काळे (वय 25), संतोष सखाराम काळे (वय 23), (तिन्ही रा. गोरोबा गल्ली, तेर, ता. जि. धाराशिव)

15 दिवसांपूर्वीची चोरी उघड

तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी सुमारे 15 दिवसांपूर्वी खरोसा परिसरातील शिंदी जवळगा गावातील शेतशिवारातून रात्रीच्या वेळी 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तोच चोरीचा माल लपवून ठेवण्यात आला होता आणि तो दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या तयारीत असताना ते रंगेहाथ पकडले गेले.

₹1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत चोरीचे सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम.एच. 25 ए.व्ही. 4427 क्रमांकाची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ₹1,38,400/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिकअप वाहनासह फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून, लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम भूमिका

ही कारवाई केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यापुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या श्रमांचे संरक्षण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शेतमाल चोरी, अवैध वाहतूक किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य, गुप्त माहिती देणाऱ्यांची भूमिका आणि पोलीस दलाची तत्परता यांच्या समन्वयातूनच अशा गुन्ह्यांचा पर्दाफाश शक्य होतो.

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सदानंद भुजबळ, पोउपनि राजेश घाडगे, तसेच पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिल्लापटे राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरूरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांच्या सहभागातून पार पडली. “गुन्हेगार कितीही चलाख असला, तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही,” हा ठाम संदेश देणारी ही कारवाई असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी व समाजाच्या सुरक्षिततेसाठी लातूर पोलीस दल सदैव सज्ज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments