लातूर/अंबादास करकरे
लातूर, दि. १६ — माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतीने २० ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एमआयटी शिक्षण संकुलातील विश्वमैदान परिसरात श्री गणेश, श्री महालक्ष्मी व श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. याच वेळी सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या ‘विश्वमैदान’ क्रीडा संकुलाचेही लोकार्पण होणार असल्याने हा सोहळा विशेष ठरणार आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरांमुळे एमआयटी संकुलात अध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, कीर्तन, हरिपाठ आणि सांस्कृतिक सादरीकरणांची मेजवानी ठेवण्यात आली आहे.
प्रेरणा आणि उपस्थित मान्यवर हा सोहळा संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वस्त तुळशीराम दा. कराड आणि काशिराम दा. कराड यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प. विद्यानंद महाराज गातेगाव, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्री, ह.भ.प. विठ्ठल महाराज फड यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी विणापूजन व मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात होईल. दिवसभर गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापना, जलाधिवास, नवग्रह स्थापना, हवन व शय्याधिवास आदी विधी पार पडतील. सायंकाळी हरिपाठ व ह.भ.प. केशव महाराज घुले यांचे कीर्तन होईल.
दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रासाद वास्तु, कुटीर होम, मुख्य देवता हवन व स्नपनविधी आदी कार्यक्रम होतील. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर ह.भ.प. वामन महाराज जाधव यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
दि. २२ फेब्रुवारी रोजी प्रातःपूजन, मूर्ती स्थापना, कलशारोहण, उत्तरांग हवन व बलिदान विधी संपन्न होतील. त्यानंतर महापूर्णाहुती, महानैवेद्य, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वेदशास्त्रसंपन्न मार्गदर्शन
या सोहळ्यात यज्ञप्रमुख म्हणून वे.शा. संपन्न रामकृष्ण कुलकर्णी गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. विविध कीर्तनकार, भजनकार व कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे.
‘विश्वमैदान’ क्रीडा संकुल – सर्वांगीण विकासाची दिशा
या कार्यक्रमादरम्यान ‘विश्वमैदान’ क्रीडा संकुलाचे लोकार्पण होणार असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमताविकासासोबत मानसिक व आध्यात्मिक प्रगतीसाठी हे संकुल उपयुक्त ठरणार आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा व संस्कार यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
या भव्य सोहळ्यास विद्यार्थी, पालक, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड व आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments