लातूर/अंबादास करकरे
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागात बनावट दारूची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत बनावट दारूने भरलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे (अंमलबजावणी व दस्ता विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड विभागाचे उपायुक्त बी.एच. तडवी (प्रभारी) यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. लातूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत, उपअधीक्षक एम. जी. मुपडे, निरीक्षक आर. व्ही. कडवे, व्हि. ओ. मुनाळे, यु. व्ही. मिसाळ दुय्यम निरीक्षक एस. पी. काळे, एस. डी. घुले, डी. डी. साळवे, एस. आर. राठोड, रामेश्वर माकोडे, शिवराज वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नीलेश गुणाले, गणेश गोळे, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, ज्योतिराम पवार, समाधान गिरी, विशाल गायकवाड आदी अधिकाऱ्यांसह पथकाने संयुक्तरीत्या ही धडक मोहीम राबवली.
२४५ बॉक्स बनावट दारू जप्त मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-अहमदपूर मार्गावर एका टेम्पोतून मोठ्या प्रमाणात बनावट दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संबंधित टेम्पो अडविण्यात आला. तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये २४५ बॉक्स बनावट दारू आढळून आली. प्रत्येक बॉक्समध्ये ९६ बॉटल्स असल्याने एकूण हजारो बॉटल्सचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे ४० लाख ८ हजार रुपये इतकी आहे.
ही दारू विविध नामांकित कंपन्यांच्या बनावट लेबलसह पॅक करून बाजारात विक्रीसाठी आणली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सदर टोळी राज्यांच्या सीमावर्ती भागात दारूचा साठा करून किरकोळ विक्रेत्यांमार्फत वितरण करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
टोळीतील संशयित ताब्यात
कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या टोळीचे धागेदोरे इतर राज्यांपर्यंत पोहोचत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याने विभागाने ही कारवाई अत्यंत गांभीर्याने केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील कारवाई सुरू
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर दारू वाहतुकीविरुद्ध विभागाची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील बनावट दारू व्यवसायाला मोठा आळा बसणार असून, नागरिकांनीही अशा संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments