Type Here to Get Search Results !

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची नांदेडमध्ये अवैध रेती उत्खननावर मोठी कारवाई १ कोटी ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; ६ आरोपी ताब्यात




नांदेड/ अंबादास करकरे 

नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहाजी उमाप, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे मुगट व ब्राह्मणवाडा शिवारात विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत दोन टाटा कंपनीचे टिप्पर, एक जेसीबी मशीन आणि नदीपात्रातून काढून ठेवलेली सुमारे ४० ब्रास रेती असा सुमारे ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३६/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

यानंतर पथकाने मुदखेड पोलीस स्टेशन हद्दीतील मुगट शिवारातील वाळू धक्यावर कारवाई केली. येथे एक टाटा टिप्पर, एक जेसीबी मशीन आणि सुमारे ३० ब्रास रेती असा ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांवर गुन्हा क्रमांक २५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन टिप्पर (सुमारे ३४ लाख रुपये), दोन जेसीबी मशीन (७० लाख रुपये) आणि सुमारे ७० ब्रास रेती (३ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खानसाळे, पोलीस कर्मचारी संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कमाजी गवळी यांनी सक्रिय सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. नदीपात्रातील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा कारवायांवर यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा अधिकृत संकेतस्थळावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments