लातूर/अंबादास करकरे
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय, लातूर येथे यंदाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांची भव्य रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दि. ०२ मार्च २०२६ या कालावधीत हा यात्रा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.
श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक
महोत्सवाची सुरुवात रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वाजता गौरी शंकर मंदिर, मार्केट यार्ड येथून श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक काढून करण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात व भाविकांच्या जयघोषात ही मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करणार आहे. १००१ महिलांच्या वतीने महारुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त १००१ महिलांच्या हस्ते श्रींचा महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे. महिला शक्तीच्या सहभागामुळे धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय होणार असून या कार्यक्रमाकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे.
कृषी चर्चा सत्र व भव्य पशू प्रदर्शन यात्रा महोत्सवात कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक शेती पद्धती, पशुपालन व बाजारपेठेतील संधी यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भव्य पशू प्रदर्शनामुळे शेतकरी बांधवांना विविध जातींच्या जनावरांची माहिती मिळणार आहे.
जंगी कुस्ती स्पर्धा रविवार दि. ०१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून कुस्तीप्रेमींसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
धार्मिक प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य श्री गुरुबाबा महाराज औसकर यांचे चक्रिभजन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय विविध कीर्तन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे यात्रेला आध्यात्मिक रंग चढणार आहे.
आतषबाजीने सांगता सोमवार दि. ०२ मार्च रोजी रात्री ८.०० वाजता शोभेची दारू उडवून आतषबाजीच्या आकर्षक रोषणाईत यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय प्रशासन तसेच यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा, वाहतूक व स्वच्छतेसाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वात लातूरकरांना धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचा अनुभव देणारा हा महोत्सव ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments