अंबादास करकरे
लातूर, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाडसी कारवाई करत तब्बल १० लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून सापळा
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी उदगीर ग्रामीण पोलिसांना त्यांच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी विशेष पथकाला संशयित वाहनाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न
पोलीस पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली असता नाईक चौक परिसरात संशयित चारचाकी वाहन दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहन थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला आणि नागलगाव परिसरात वाहन अडवून पकडण्यात यश मिळवले.
आरोपी व मुद्देमाल
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये आखीब मुसाभाई मिर्झा (वय २७ वर्ष, रा. मदिना नगर, उदगीर) हा इसम आढळून आला. चौकशीत त्याच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला “विमल” नावाचा तंबाखूजन्य गुटखा वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत सदर माल हा फिरोज पटवेकर (रा. नळेगाव) यांच्याकडे आर्थिक फायद्यासाठी नेला जात असल्याची माहिती आरोपीने दिली.
या कारवाईत पोलिसांनी –
अंदाजे ₹२,८०,८००/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा टोयोटा कंपनीची इटिऑस चारचाकी (MH 12 HL 9780) अंदाजे किंमत ₹७,५०,०००/- असा एकूण ₹१०,३०,८००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ९३/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायपाल्ले हे करीत असून अवैध गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांचा इशारा
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अवैध धंदे, प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक व सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment
0 Comments