अंबादास करकरे
लातूर लातुरातील ऑटोचालकाची इमानदारी; मौल्यवान ऐवजासह पर्स सुखरूप परत
लातूर शहरात प्रामाणिकतेचे कौतुकास्पद उदाहरण समोर आले असून एका ऑटोचालकाने प्रवाशाची मौल्यवान पर्स कोणतीही छेडछाड न करता पोलिसांकडे जमा करून प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे. गिरवलकर नगर, लातूर येथील पंडित सदाशिव कांबळे (वय ७२) व सोजरबाई सदाशिव कांबळे (वय ६५) हे खंडापूर येथे पादुका दर्शनासाठी जाण्यासाठी १ नंबर चौकातून ऑटो क्रमांक MH 24 AT 8995 मध्ये बसले होते. प्रवास पूर्ण करून उतरताना सोजरबाई कांबळे यांची पर्स ऑटोमध्येच राहिली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पर्स हरवल्याचे समजताच कांबळे दाम्पत्याने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित ऑटोचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, ऑटो चालक बाबासाहेब श्यामसुंदर साबळे (वय ३४, रा. राजे शिवाजी नगर, लातूर) यांच्या ऑटोमध्ये संबंधित पर्स आढळून आली. पर्समध्ये ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, रोख २,००० रुपये आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे एक लाख रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल होता. मात्र, कोणतीही छेडछाड न करता साबळे यांनी संपूर्ण एवजासहित पर्स थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा केली.
पोलिसांनी खातरजमा करून पर्स व त्यातील सर्व मुद्देमाल कांबळे दाम्पत्याच्या ताब्यात दिला. हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ऑटो चालकाचे आभार मानले. या घटनेमुळे बाबासाहेब साबळे यांच्या इमानदारीचे शहरभर कौतुक होत असून पोलिस प्रशासनानेही त्यांचे अभिनंदन केले आहे. आजच्या काळातही प्रामाणिकपणा जपणारे नागरिक समाजात आहेत, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.

Post a Comment
0 Comments