Type Here to Get Search Results !

No title


लातूर/अंबादास करकरे 

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

लातूर, दि. २६ : केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी आदी उपस्थित होते.

युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन व प्रशिक्षणावर भर

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी करिअर मार्गदर्शन केंद्रे प्रभावीपणे चालवावीत, असे निर्देश त्यांनी दिले. स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

जिल्ह्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत श्री. आठवले यांनी कच्च्या घरांऐवजी पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी झोपडपट्टी भागात विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन केले. लातूर शहरातील विलासनगर व कॉईल नगर परिसरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना पक्के घर मिळावे यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

विविध योजनांचा सविस्तर आढावा

बैठकीत शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना तसेच मुद्रा योजनेचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती सादर केली.

जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना, मनपा आयुक्त श्रीमती मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. गायकवाड आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. नाईकवाडी यांनी विभागाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला.

Post a Comment

0 Comments