अंबादास करकरे
दिनांक : २६ फेब्रुवारी २०२६
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तिघा आरोपींना अवघ्या एका तासात जेरबंद; देवणी पोलिसांची वेगवान कारवाई लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने सतर्क असून प्रत्येक गुन्ह्यावर तात्काळ कारवाई करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने देवणी पोलीस ठाण्याच्या पथकाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तिघा आरोपींना अवघ्या एका तासाच्या आत ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे देवणी येथे गुरनं. ४४/२०२६ अन्वये कलम १३७(२), ३(५) बी.एन.एस.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सूचनांनुसार आरोपींचा शोध वेगाने सुरू करण्यात आला. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे –१) कलीम हाकानी शेख (वय २० वर्षे)२) अशपाक करीम शेख (वय २० वर्षे) ३) बिलाल खालेद कुरेशी (वय २५ वर्षे) सर्व रा. उदगीर, ता. उदगीर हे पिडीत अल्पवयीन मुलीस स्काय ब्ल्यू रंगाच्या ईटॉस वाहनातून छत्रपती संभाजीनगर दिशेने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
तत्काळ बीड व छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस तसेच महामार्ग सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधण्यात आला. बीड ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पाचोड टोलनाक्यावर नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, महामार्ग सुरक्षा पथक, बीड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुंढे यांनी संपर्क साधून आरोपी व पिडीत मुलगी यांना गेवराई येथे ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
यानंतर देवणी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोउपनि व-हाडे, सफौ सय्यद व महिला पोलीस अंमलदार गोपे यांनी तात्काळ गेवराई येथे जाऊन आरोपी, वाहन व पिडीत मुलगी यांना ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाईसाठी देवणी येथे आणले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे देवणीचे सपोनि बी. एस. गायकवाड, पोउपनि व-हाडे, सफौ सय्यद, मपोह/७९२ गोपे यांनी समन्वयाने व तत्परतेने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि व-हाडे करीत आहेत.
या प्रकरणात देवणी पोलिसांनी दाखविलेली वेगवान आणि समन्वयात्मक कारवाई उल्लेखनीय ठरली असून अल्पवयीन मुलीचा शोध अल्पावधीत लागल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.
Post a Comment
0 Comments