अंबादास करकरे
लातूर : परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांची ई चलन पद्धत जाचक आणि अन्यायकारक असल्याचा दावा करीत राज्यातील अनेक वाहतूकदार संघटनांनी एकत्र येत येत्या ५ मार्च २०२६ पासून बेमुदत बंद आणि आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जाचक ई-चलन प्रणालीमुळे चुकीचे दंड आकारण्यात येत असून वाहतूकदारांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने केला आहे.
राज्यात परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून जाचक आणि अन्यायकारक दंड आकारण्यात येत आहे यातून सर्वसामान्य वाहतूकदारांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी ई-चलन प्रणाली रद्द करून जाचक दंड वसुली थांबवावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने राजव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व वाहतुकदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान वाहतूकदार संघटनांनी पुकारलेले हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. आपल्या मागण्या संवादातून सोडविल्या जातील या संदर्भात ५ मार्च रोजी परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे.
वाहतूकदारांच्या या राज्यव्यापी आंदोलनात लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन, लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघ, लोकनायक मोटार चालक मालक संघ सहभागी होत आहेत. ई-चलन मुळे होत असलेल्या अन्यायाविरोधात लातूर जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार संघटनांनी, सर्वसामान्य वाहतुकदारांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सुनिल देशपांडे, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, संदीप पाटील, जगदीश स्वामी, विश्वास कुलकर्णी, उत्तम लोंढे, मदन केंद्रे, जाकीर सय्यद, प्रितेश भंडारी, नरेश घंटे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments