Type Here to Get Search Results !

गरूड चौकात मटका अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा दोन जण ताब्यात; २९,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कारवाई, शहरातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम तीव्र


लातूर/अंबादास करकरे 

लातूर शहरातील गरूड चौक परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेत २९ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी केली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीत ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर सायंकाळी सुमारे चार वाजता गरूड चौक येथे अचानक छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान दोन इसम प्रत्यक्ष मटका जुगार खेळवत असल्याचे आढळून आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

विजय व्यंकट परगे (वय ३१, रा. महादेव नगर, लातूर) समीर इब्राहीम सय्यद (वय २८, रा. आंबेडकर चौक, लातूर) पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता मटका जुगाराचे साहित्य, आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण २९,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांच्यासह सफौ उत्तम जाधव, पोलीस अंमलदार युसुफ शेख, रामहरी भोसले, दिपक वैष्णव आणि संजय बेरळीकर (विवेकानंद चौक पोलीस ठाणे) यांच्या पथकाने केली.

दरम्यान, शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments