Type Here to Get Search Results !

*खरंच आता लातूर शांत आणि सुरक्षित आहे का?*



हा प्रश्न माझ्या एका बाहेर जिल्ह्यातील पत्रकार मित्राने मला विचारला आणि खरं सांगतो मी थोड्या वेळासाठी निशब्द झालो आणि कसाबसा त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरलो. त्याने हा प्रश्न विचारण्यालाही एक पार्श्वभूमी आहे. लातूरची संस्कृती, सामाजिक सलोखा, बंधुभाव राखण्यात आणि गुन्हेगारी रोखण्यात अनेक कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचे योगदान आहे याबद्दल नेहमीच मी त्याला अनेक घटनांचा संदर्भ देऊन सांगत असायचो. पोलीसांचा धाक आणि दरारा होता गुन्हेगारांमध्ये. माझं लातूर परिवार नेहमीच पोलीस प्रशासनास सहकार्य करीत आले आहे. किंबहुना परिवाराने समोर आणलेल्या अनेक अवैध बाबींवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून त्यास आळा देखील घातला. मात्र दुर्दैवाने आज ही परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अप्रिय घटना पाहता पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दहशत, हाणामारी, शस्त्रांचा खुलेआम वापर, टोळी युद्ध, दादागिरी, खंडणी, वाढते अवैध धंदे, मटका, जुगार यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील काही अंशी असलेला विश्वास आता पूर्णतः नाहीसा होतो की काय एवढी भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर असलेली पोलिसांची पकड फेल होत असल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर पोलीस दलाने आता Active mode वर आले पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. माझं लातूर परिवार पोलीस प्रशासनास परत एकदा विनंती करत आहे की तुम्ही पोलीस व्हा. आम्हाला तुमचा गुन्हेगारांवर असलेला दरारा, वचक पुन्हा पहायचा आहे. काही अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होता कामा नये याची दक्षता लातूर पोलीस दलातील खऱ्या सिंघम अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही लातूरकरांनी आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याला आपल्या कृतीची साथ हवी आहे. तो विश्वास, आदर, सन्मान कमी होता कामा नये याची दक्षता घ्याल हीच अपेक्षा आहे.

सतीश तांदळे 

माझं लातूर परिवार

Post a Comment

0 Comments