लातूर/अंबादास करकरे
अवघ्या ६ लाख रुपयांसाठी संगनमताने रचलेला बनावट चोरीचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.नं. ५३/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कौशल्यपूर्ण पद्धतीने करत खोटा चोरीचा बनाव असल्याचे उघड केले.
कट कसा रचला?
टिळकनगर येथील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेला जावेद जलील शेख (वय २७, रा. इस्लामपुरा, लातूर) याच्याकडे व त्याचा सहकारी अर्शद शेख याच्याकडे ग्राहकांकडून जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली जात असे. दि. ५ फेब्रुवारी रोजी जावेदकडे ९० हजार रुपये तर अर्शदकडे ६ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी देण्यात आले. दोघांनीही ती रक्कम आपल्या-आपल्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान, जावेदने आपला मित्र आकाश प्रकाश ढगे (वय ३०, रा. जोडजवळा, सध्या लेबर कॉलनी, लातूर) याच्याशी संगनमत करून अर्शदच्या स्कूटरची बनावट चावी तयार केली होती. चहाच्या स्टॉलवर थांबले असताना जावेदने आकाशला फोनवर माहिती दिली. काही वेळात अर्शदची स्कूटर गायब झाली आणि नंतर हायटेक सेंटरसमोरील बोळात सापडली; मात्र डिक्कीतून ६ लाख रुपये लंपास झाले होते.
तपासात उघडकीस आले सत्य
प्राथमिक चौकशीत संशय वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने जावेद शेख यास दि. ८ फेब्रुवारी रोजी खोरी गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर फरार आरोपी आकाश ढगे याचा शोध घेऊन दि. १७ फेब्रुवारी रोजी जोडजवळा येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने ६ लाखांपैकी ५० हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले. उर्वरित ५ लाख ५० हजार रुपये त्याने जोडजवळा येथील भावाच्या घरात लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी ती रक्कम जप्त केली.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सफौ सर्जेराव जगताप तसेच अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, प्रदीप स्वामी, जमीर शेख, सुरेखा मदने, श्रीनिवास जांभळे, राहुल कांबळे यांनी तपासात सहभाग घेतला.
पुढील तपास सुरू
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे सुरू आहे. अवघ्या पैशाच्या मोहापायी रचलेला बनावट चोरीचा कट पोलिसांच्या कसून तपासामुळे उघडकीस आल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment
0 Comments