Type Here to Get Search Results !

लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा तीन तासांत उघड; आरोपीकडून ९ तोळे सोने जप्त


अंबादास करकरे 

लातूर, दि. 24 फेब्रुवारी — लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीस गेलेले ९ तोळे सोने १०० टक्के हस्तगत केले. या जलद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडगाव (ता. जि. लातूर) येथील सुनिता दगडू भामरे (वय ५०) यांनी २३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्यांनी नमूद केले. चोरीमध्ये गंठन, सहा अंगठ्या, बोरमाळ, सरपाळे व दोन झुमके असा एकूण सुमारे ९ तोळे सोन्याचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी गुन्हा क्र. ३०/२०२६, कलम 305(A), 331(3) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोल तांबे (पोलीस अधीक्षक, लातूर), मंगेश चव्हाण (अपर पोलीस अधीक्षक) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. अरविंद पवार (पोलीस निरीक्षक, लातूर ग्रामीण) यांनी घटनास्थळाची पाहणी, स्थानिक माहितीदारांची मदत व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची पडताळणी सुरू केली. तपासादरम्यान प्रशांत दगडू भामरे (वय ३०, रा. भाडगाव) यास ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादीचा मुलगा असून घरातील परिस्थितीची माहिती असल्याने त्यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याने चोरी केलेले दागिने स्वतःच्या घरातील कपाटात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून सर्व मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा नोंद झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत आरोपीस अटक करून संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आल्याने लातूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे करीत आहेत. या कारवाईत सहाय्यक फौजदार व तपास पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments