अंबादास करकरे
लातूर, दि. २५ फेब्रुवारी — तालुक्यातील खंडापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पादुका दर्शन सोहळ्याला भाविक-भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भजन-कीर्तन, गाथा पारायण आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
या सोहळ्यात संत परंपरेतील पादुकांचे दर्शन ठेवण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात भाविकांचा महापूर उसळला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागत आहेत. भजन-कीर्तनांच्या सुरांनी आणि हरिनामाच्या गजराने खंडापूर परिसर दुमदुमून गेला आहे.
प्रशासनाच्या वतीने आणि खंडापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सोयी व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षेची कडक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शन प्रक्रिया शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत.
लाखो भाविकांचा ओघ
सोहळ्याला जिल्ह्यासह बाहेर गावांमधूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. दररोज लाखो भाविक पादुका दर्शन घेत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. सकाळी काकड आरती पासून रात्री हरिपाठ व प्रवचनांपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका सुरू आहे.
तीन हजार स्वयंसेवकांचे सेवाकार्य
या भव्य सोहळ्यात सुमारे तीन हजार स्वयंसेवक विविध विभागांत कार्यरत आहेत. स्वच्छता मोहीम, भोजन वाटप, पिण्याचे पाणी, वाहतूक नियंत्रण आणि आरोग्य सेवा अशा विविध जबाबदाऱ्या स्वयंसेवक पार पाडत आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एकूणच, खंडापुरातील पादुका दर्शन सोहळ्यामुळे परिसरात भक्तीचा जागर निर्माण झाला असून भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आयोजकांनी सर्वांनी शिस्त राखून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments