Type Here to Get Search Results !

गुटखा विरोधात पोलिसांची धडक मोहीम; 13 आरोपी गजाआड, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त — मात्र ठोक विक्रेत्यांवर कारवाई कधी?



अंबादास करकरे

लातूर/नांदेड परिक्षेत्र, दि. 17 मार्च 2026 राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली असून, नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ₹14.43 लाख किमतीचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 31 मार्च दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात एकूण 9 कारवाया करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बहुतांश पान टपरी चालकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

लातूर जिल्ह्यात स्वतंत्र कारवाया

दरम्यान, लातूर जिल्ह्यातही स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सलग छापेमारी करत गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.

विवेकानंद चौक परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर एक आरोपी फरार झाला. या कारवाईत ₹39,500 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच देवणी परिसरात तीन स्वतंत्र कारवायांमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, गुटखा व दुचाकीसह ₹3 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

ठोक विक्रेत्यांवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरित

एकीकडे पोलिसांकडून पान टपरी चालक आणि लहान विक्रेत्यांवर कारवाई होत असताना, दुसरीकडे लातूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याचे ठोक विक्रेते खुलेआम कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

या ठोक विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही?

लातूर स्थानिक गुन्हे शाखेतील त्या दोन कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हा अवैध व्यवसाय सुरू आहे? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

नागरिकांची मागणी:- फक्त किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे तर ठोक विक्रेत्यांवरही कठोर कारवाई करावी! 

गुटखा पुरवठ्याची साखळी पूर्णपणे मोडीत काढावी!

संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी!

पोलिसांचे आवाहन गुटखा, पान मसाला, मावा, खर्रा यांसारख्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध पुढील काळात आणखी कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईन (📞 9150100100) वर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निष्कर्ष: गुटखा विरोधातील कारवाईला वेग आला असला तरी, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या साखळीवर आळा बसणार का? ठोक विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये तीव्रतेने उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments