Type Here to Get Search Results !

लातूर RTO अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ १८ मार्चला आंदोलनाचा इशारा; तोंडाला काळे फासून धिंड काढण्याचा इशारा



अंबादास करकरे 

लातूर, दि. १४ : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अधिकाऱ्यांकडून रेती, मुरूम, खडी व दगड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर अवास्तव ऑनलाइन दंड आकारला जात असल्याचा आरोप करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निषेधार्थ १८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसवून धिंड काढण्याचा इशारा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लातूर हा शांत आणि शिस्तप्रिय जिल्हा असून येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक लोकांकडून सहकार्य मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून RTO कार्यालयातील काही अधिकारी रेती, मुरूम, खडी आणि दगड वाहतूक करणाऱ्या ट्रक, टिप्पर आणि हायवा चालकांना जास्त साहित्य भरल्याचा आरोप करून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दंड आकारत आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा वाहनचालकांशी उद्धटपणे वागून शिवीगाळ केली जाते तसेच वाहन तपासणीदरम्यान मोबाईल जप्त करून वाहनांना वजन काट्यावर नेले जाते. जादा वजन असल्याचे सांगून ३८ ते ४० हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन दंड लावला जातो आणि काही प्रकरणांत वाहने जप्तही केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या कारवाईमुळे आधीच तहसील प्रशासनाच्या कारवाईमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांवर आणखी आर्थिक भार पडत असून अनेकांनी आपले ट्रक, टिप्पर आणि हायवा विकण्याची वेळ आल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. परिणामी लातूरमधील बांधकाम व्यवसायावरही याचा परिणाम होत असून हा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय मिनी डोअर, लहान टेम्पो व टमटम चालकांनाही जादा प्रवासी किंवा साहित्य वाहतूक केल्याच्या कारणावरून १८ ते २० हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन दंड आकारला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.

या सर्व प्रकारांच्या निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने १८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता RTO कार्यालयासमोर कार्यकर्ते व वाहनचालकांसह आंदोलन करण्यात येणार असून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ प्रतीकात्मक धिंड काढण्यात येणार असल्याचा इशारा प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments