Type Here to Get Search Results !

बाभळगावजवळ मोटारसायकलवरून विदेशी दारूची अवैध वाहतूक; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त


अंबादास करकरे 

लातूर, दि. १३ : लातूर जिल्ह्यातील बाभळगाव परिसरात विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर लातूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३६ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर ही कारवाई केली. पोलीस शिपाई अमोल गुरुनाथ स्वामी यांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता बाभळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौधरी यांच्या घरासमोरील चौकात आरोपी बालाजी बबुवान कासले (रा. बोरी, ता. जि. लातूर) हा मोटारसायकलवरून विदेशी दारूची अवैध वाहतूक करताना पोलिसांच्या हाती लागला.

पोलीसांनी आरोपीकडून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यात मास्टर्स ओ लाईट प्रीमियम व्हिस्की, मॅजिक मोमेंट्स, एमसी नं.१ आणि रॉयल स्टॅग या ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे. या सर्व दारूसह एमएच-२४-एए-७६९२ क्रमांकाची पॅशन प्रो मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली.

या कारवाईत एकूण ३६ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी हा विना परवाना विदेशी दारूची चोरीछुपे विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक यादव हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments