Type Here to Get Search Results !

निकोप स्पर्धेतूनच विश्वशांतीचा संदेश – डॉ. विश्वनाथ कराड राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ



अंबादास करकरे 

लातूर, दि. १० : आज जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असून संपूर्ण जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशा परिस्थितीत परस्परांबद्दल जिव्हाळा, आत्मीयता, प्रेम आणि संघभावना वाढविण्याची गरज आहे. युद्धाच्या जागी खेळ आणि विनाशाच्या जागी विकासाचा संदेश देणारे माध्यम म्हणजे खेळ असून कुस्तीच्या मैदानातूनही विश्वशांतीचा संदेश दिला जाऊ शकतो, असे प्रतिपादन विश्वशांती केंद्र (आळंदी) व माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले.

राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही स्पर्धा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) येथील विश्वधर्मी मानवतातीर्थाच्या विशाल प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.

या प्रसंगी हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, बंडातात्या पाटील, ह.भ.प. बापूसाहेब मोरे, विष्णू जोशीलकर, माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, आमदार रमेशअप्पा कराड, डॉ. हनुमंत कराड, राजेश कराड, ऋषिकेश कराड, प्रा. तेजस कराड, बाळासाहेब बडवे, सरकार निंबाळकर, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. रत्नदीप जोशी, डॉ. महेश थोरवे व प्रा. विलास कथुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, “मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे” अशी परंपरा असलेल्या या भूमीत जागतिक स्तरावरील पैलवान येत आहेत ही अभिमानाची बाब आहे. खेळ ही लोकांना जोडणारी आणि भावी पिढीला दिशा देणारी परंपरा आहे. गेली १९ वर्षे ही कुस्ती स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रमुख पाहुणे हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग यांनी सांगितले की, आधुनिक काळातही लाल मातीतल्या कुस्तीवर प्रेम करणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खऱ्या अर्थाने कुस्ती संस्कृती जपण्याचे काम करत आहेत. पैलवानांना त्यांनी दिलेला आधार त्यांच्या खेळावरील प्रेमाची साक्ष देतो. ही स्पर्धा पुढील पिढ्यांनीही याच उत्साहात सुरू ठेवावी.

ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जीवनातील प्रत्येक गोष्टीतून आनंद कसा घ्यायचा हे डॉ. कराड यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. समाजातील प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे व्यासपीठ उभे केले आहे.

बाळासाहेब बडवे यांनीही महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला अजरामर ठेवण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सुमारे २५० पैलवान लाल मातीत उतरणार आहेत. उद्घाटनाची कुस्ती रामेश्वर (रुई) येथील प्रसाद शिंदे आणि कोल्हापूर येथील प्रणव राख यांच्यात रंगली.

कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन बाबा निम्हण यांनी केले. प्रा. विलास कथुरे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments