अंबादास करकरे
लातूर,
विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि माईर्स एमआयटी, पुणे यांच्या तर्फे राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ चे आयोजन रामेश्वर (रुई), लातूर येथे मंगळवार दि. १० मार्च रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेला राज्यभरातील नामवंत मल्लांसह देशभरातील कुस्तीपटू सहभागी होणार असून क्रीडाप्रेमींसाठी ही मोठी मेजवानी ठरणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर येथे करण्यात आले असून माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ९ वाजता होणार असून पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
समारंभास ट्रिपल महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार विजेते पै. नरसिंग यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच हिंद केसरी पै. जगदीश कालीरमण विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम आणि महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र श्री पै. विजय उर्फ विकी बनकर हेही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रामेश्वर (रुई) चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड हे स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक असून विश्वशांती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १९ वे वर्ष असून महावीर केसरी गटातील विजेत्या मल्लास १ लाख २५ हजार रुपये रोख, चांदीची गदा, मेडल व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी १ लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६ आणि ८६ प्लस ते १२५ किलो या वजन गटांमध्ये सामने होणार असून विजेत्या मल्लांना सुवर्ण, रौप्य व कास्य पदके, प्रमाणपत्रे आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेल्या सर्व कुस्तीपटूंना मानधन देण्यात येणार आहे.
याशिवाय थोर स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय कीर्तनकार व योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ७५ वर्षांवरील मल्लांसाठी विशेष कुस्ती स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रमेशअप्पा कराड, संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. महेश थोरवे आणि क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ यांनी केले आहे.




Post a Comment
0 Comments