अंबादास करकरे
लातूर | दि. 25 मार्च 2026
महाराष्ट्र शासनाने राज्यभर ऑनलाईन लॉटरी, “प्ले गेम” व स्किल गेमच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार प्रकारांवर बंदी घातली असतानाही लातूरातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे “या लॉटरी चालकांसाठी वेगळा कायदा आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्ये पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत अशा दुकानांवर टाळे ठोकले असताना, लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मात्र हे व्यवसाय अजूनही सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदपूर येथे पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईने या मुद्द्याला पुन्हा एकदा जोर चढला आहे.
अहमदपूरमध्ये मोठी कारवाई
लातूर जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायाविरोधात पोलीसांनी अहमदपूर शहरात मटका व ऑनलाईन लॉटरी अड्ड्यांवर सलग छापे टाकत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण ₹1,05,560/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 24 मार्च रोजी विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भाजी मार्केट, मारोती मंदिर परिसर आणि मटन मार्केट येथे एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई केली. मटका जुगार (मिलन डे) चालवणारा आरोपी सुरज हिरालाल राउत्रे (वय 32) हा मोबाईलद्वारे “मिलन डे” मटका चालवत असताना आढळला. त्याच्याकडून ₹25,000/- मुद्देमाल जप्त.
ऑनलाईन लॉटरी – Play Game
गोपीचंद राजकुमार भगत (वय 32) हा संगणकाच्या सहाय्याने “Play Game” लॉटरी चालवत होता. ₹53,830/- मुद्देमाल जप्त. ऑनलाईन लॉटरी – Fun Target
सुनिल रामराव गायकवाड (वय 34) हा “Fun Target” नावाने जुगार चालवत होता. ₹26,730/- मुद्देमाल जप्त. तीन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) तसेच महाराष्ट्र राज्य लॉटरी अधिनियम कलम 4 (अ) (ग) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अहमदपूरमध्ये अशी धडक कारवाई होत असताना, लातूर शहरात मात्र ऑनलाईन लॉटरी व “प्ले गेम” केंद्रे सुरूच असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही ठिकाणी पोलिसांची कारवाई होते, तर काही ठिकाणी दुर्लक्ष का? असा सवालही उपस्थित होत आहे. पोलीसांचा इशारा
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वी केली असून, जिल्ह्यातील अवैध जुगार व्यवसायांविरोधात मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
राज्यात बंदी असतानाही लातूरमध्ये सुरू असलेला ऑनलाईन जुगार हा कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अहमदपूर कारवाईनंतर आता संपूर्ण जिल्ह्यात एकसमान कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment
0 Comments