अंबादास करकरे
(लातूर) — लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वाढवणा (बु.) परिसरात पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर मोठी धडक कारवाई करत तब्बल २३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मन्ना उमरगा शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळ लिंबाच्या झाडाखाली ‘तिर्रट’ नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी रविवारी (दि. २२ मार्च २०२६) रात्री सापळा रचत अचानक छापा टाकला.
या धाडीत पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना रंगेहात पकडले असून पाच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संभाजी पाटील, शिवकांत मिरजगावे, शिवकुमार शेळके, लईकोद्दीन चौधरी, विलास दहीकांबळे आणि ज्ञानेश्वर सारोळे यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून २१ हजार ५०० रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच तब्बल २३ लाख २० हजार रुपये किमतीची दहा वाहने जप्त केली आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २३ लाख ४१ हजार ५०० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अजित राठोड, बालाप्रसाद उर्फ प्रविण गिल्डा, गोविंद चव्हाण, पवन आणि रुषीकेश वाघमारे हे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय दळवे, शिवप्रताप रंगवाळ, आकेमोड, आकाश नागपूरकर आणि अतुल बिरादार यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीरीत्या अंजाम दिली.
👉 या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments