Type Here to Get Search Results !

१३ वर्षांपासून फरार आरोपी पुण्यातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई


अंबादास करकरे 

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १३ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला पुणे येथून जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

पोलीस ठाणे किल्लारी येथील गुन्हा क्रमांक 45/2013 अंतर्गत कलम 376 भादंवि, तसेच गुन्हा क्रमांक 59/2017 अंतर्गत कलम 307, 353, 333, 506 भादंवि आणि पोलीस ठाणे गांधी चौक, लातूर येथील गुन्हा क्रमांक 196/2013 कलम 224 भादंवि या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी दयानंद पांडुरंग देडे (वय 36, रा. नांदुर्गा, ता. औसा, जि. लातूर) हा गेल्या १३ वर्षांपासून फरार होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने ही कारवाई पार पाडली. या पथकात सर्जेराव जगताप यांच्यासह साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, मनोज खोसे आणि शैलेश सुडे यांचा समावेश होता.

पथकाने प्रथम आरोपीच्या मूळ गावी नांदुर्गा (ता. औसा) येथे शोधमोहीम राबवली. त्यावेळी आरोपी पुणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ पुण्याकडे मोर्चा वळवला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.

अखेर नागेश्वर कॉलनी, मोशी (ता. हवेली, जि. पुणे) येथे आरोपी आढळून आला. पोलिसांनी नियोजनपूर्वक सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. दीर्घकाळ फरार असलेल्या या आरोपीचा शोध घेणे पोलीस दलासमोर मोठे आव्हान होते. मात्र चिकाटी, अचूक माहिती संकलन आणि काटेकोर नियोजनामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे किल्लारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

👉 या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळाले असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

Post a Comment

0 Comments