Type Here to Get Search Results !

लातूरमध्ये कॉपर वायर चोरी प्रकरणाचा मोठा उलगडा; ५ आंतरराज्यीय आरोपी अटकेत

 


लातूर/अंबादास करकरे 

उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या मालिकेचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून, या प्रकरणी ५ आंतरराज्यीय आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ₹72,880 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेल्या कॉपर वायर चोरी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे गु.र.नं. 78/2026 व 80/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

फिर्यादी बालाजी धनराज तरवडे व इतर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, 26 ते 27 मार्च दरम्यान एकुर्का रोड परिसरातील साठवण तलावाजवळील डी.पी.वरून सुमारे 1050 मीटर कॉपर वायर (₹84,000) चोरीस गेले. त्याचप्रमाणे डांगेवाडी परिसरातून 461 मीटर वायर (₹36,880) चोरी करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे: रिहाईस जिवराज पवार (24), सुजेश नवाब पवार (26), दुकीस मलबकस पवार (35), सासन सार्जन पवार (24), बबू जिवराज पवार (26)

ही टोळी गावाजवळ मोकळ्या जागेत राहून किंवा शेतात कामाच्या बहाण्याने येऊन रेकी करत असे. चोरी केलेले वायर जाळून त्यातील तांबे वेगळे करून विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. जप्त मुद्देमाल 23 किलो कॉपर वायर, रेडमी, विवो, आयक्यू कंपनीचे 4 मोबाईल “Pure Gold 999” असा ठसा असलेले बनावट पितळ बिस्किट

या बनावट सोन्याद्वारे फसवणूक झाली आहे का, याचाही तपास सुरू आहे. पुढील तपास आरोपींनी वाढवणा, अहमदपूर, जळकोट, उदगीर आणि कर्नाटकातील कमलनगर भागातही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. चोरीचा माल भंगार विक्रेत्यांना विकल्याची माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तपासी अधिकारी तुकाराम बळदे, शिवप्रताप रंगवाळ, संजय दळवे, बालाजी आकेमोड, शिवाजी केंद्रे, गोरख कसबे, राजेश कंचे यांचे विशेष योगदान राहिले.

गावात किंवा शेतात संशयास्पद हालचाली करणाऱ्या अनोळखी व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  लातूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ग्रामीण भागातील चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments