लातूर/अंबादास करकरे
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रात समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीत विविध विभागातील अधिकारी तसेच पाच शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना भेडसावणारा शेत रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी, सनियंत्रण आणि समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लातूर ग्रामीणसाठीही ही समिती अस्तित्वात आली आहे.
या समितीत सचिव म्हणून उपविभागीय अधिकारी, लातूर तर सहसचिव म्हणून उपविभागीय अधिकारी, औसा-रेणापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून शेतकरी प्रतिनिधी अनिल भाऊसाहेब भिसे, सुकेश किशनराव भंडारे, सुरज जगन्नाथ शिंदे, दीपक भागवत वागस्कर आणि राजकिरण माणिकराव साठे यांचा समावेश आहे. तसेच गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमि अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि पंचायत समितीचे लेखाधिकारी यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.
सदर समितीमार्फत योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर करणे, कार्यकारी यंत्रणेची निवड, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड तसेच आवश्यक ठिकाणी शेत रस्त्यांचे ग्रामीण रस्त्यांमध्ये रूपांतर करून ग्रामविकास विभागाकडे शिफारस करणे अशी विविध कामे केली जाणार आहेत.
दरम्यान, समिती अध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड तसेच शेतकरी प्रतिनिधी सदस्यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments