Type Here to Get Search Results !

लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा पुन्हा घाव; चार आरोपी अटकेत, ₹१३.७ लाखांचा मुद्देमाल जप्त


अंबादास करकरे 

लातूर, दि. १३ एप्रिल — जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणी आणखी एक कारवाई करत सट्टा चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹१३.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी अंबेजोगाई रोड परिसरात सापळा रचून छापा टाकला. एका चारचाकी वाहनामध्ये बसून मोबाईलद्वारे आयपीएल सामन्यांवर सट्टा घेत असताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
१) सचिन प्रकाश वलसे (वय ४७, रा. मयूरबन कॉलनी, अंबेजोगाई रोड, लातूर) २) किरणकुमार अर्जुन केंद्रे (वय ४१, रा. कृपा सदन रोड, गणेश मेडिकलजवळ, लातूर) ३) गंगाधर रामराव घाडगे (वय ५१, रा. होळी, ता. लोदगा, जि. लातूर) ४) मनीष श्रीकांत पंचाक्षरी (वय ३७, रा. खडक हनुमान, दयाराम रोड, लातूर)
प्राथमिक चौकशीत आरोपी आयपीएल सामन्यांवर सट्टा घेऊन मोबाईल व ऑनलाइन माध्यमांचा वापर करून ग्राहकांशी संपर्क ठेवत पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

छाप्यात आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा व्यवहाराच्या नोंदी तसेच क्रेटा चारचाकी वाहन (MH 26 BT 9909) असा एकूण ₹१३,७३,०९० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान “सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स” या आयपीएल सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाईत पोउपनि राजेश घाडगे, पोलीस अमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने व जमीर शेख यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, या कारवाईनंतर नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. “मोठे मासे सोडून बारीक मासे गळाला लावले जात आहेत का?” असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, अशा कारवायापेक्षा खऱ्या अर्थाने मोठ्या सट्टा रॅकेटपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments