अंबादास करकरे
लातूर शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा समारंभ आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
या नवीन रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राहणार आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व महिला बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यास विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले तसेच महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
लातूर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार असून, नागरिकांना आधुनिक आणि सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments