लातूर अंबादास करकरे
खोपेगाव, पेठ आणि चांडेश्वर येथील नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सिटी बस सेवा सुरू करण्याच्या मागणीला गती मिळाली आहे. याबाबत लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या भागातील नागरिकांना शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन कामांसाठी लातूर शहरात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः विद्यार्थ्यांना वाहतुकीअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने सिटी बस सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.
दरम्यान, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांचीही भेट घेऊन खोपेगाव, पेठ आणि चांडेश्वर या गावांमध्ये सिटी बस सेवा सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
महापौर आणि आयुक्त या दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संबंधित गावांतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. लवकरच बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर जयश्री सोनकांबळे आणि आयुक्त मानसी मीना यांचे नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


Post a Comment
0 Comments