लातूर, दि. १७ – आगामी मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला जात असल्याने जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे, उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा आणि जनजागृतीवर भर द्यावा. तसेच मॉन्सूनपूर्व काळात रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहीर पुनर्भरण मोहिमा राबवाव्यात, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री भोसले म्हणाले की, सध्या जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी असली तरी काही गावांमध्ये टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे तातडीने उपाययोजना मंजूर करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, गळती रोखणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. लातूर शहराला स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा यासाठी आवश्यक त्या प्रयोगशाळा उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून पाणी पुरवठा योजनांची वीज खंडित होऊ नये, यासाठी समन्वय राखण्याच्या सूचना देताना, तांड्यावरील पाणीटंचाई निवारणासाठी विशेष उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच बंधारे, तलावातील गाळ उपसा मोहीम स्वरूपात राबवून जलसाठा वाढवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर, चापोली, हाडोळती, किनगाव यांसारख्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण असल्याचे नमूद करत त्यांना गती देण्याची गरज व्यक्त केली. तसेच थकीत वीज बिलांमुळे कोणतीही योजना बंद पडू नये यासाठी सौरऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजना राबवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे सांगितले. ब्रीज-कम-बंधारे उभारणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहीर पुनर्भरण मोहिमा राबवून नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्यातील भंगेवाडी, महादेववाडी आदी भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगून तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी केली. तसेच किलारी पाणी पुरवठा योजनेतील गळती थांबवून पाण्याचा अपव्यय रोखण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
एकूणच, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहून जलसंधारण, नियोजन आणि जनजागृती यावर भर देण्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून देण्यात आले.


Post a Comment
0 Comments