लातूर/अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याच्या अवैध साठा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ₹8.59 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून, आरोग्यास घातक पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे.
दि. 18 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार कासार शिरशी पोलीस स्टेशन हद्दीतील तांबाळा पाटी परिसरात सापळा रचण्यात आला. या दरम्यान संशयित पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी वॅगनर (MH-24 CD-3593) कार अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला.
वाहन चालक व मालक संजय काशिनाथ कन्ना (वय 45, रा. उस्तुरी, ता. निलंगा) यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करण्यात आला. कारवाईदरम्यान खालील प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले: रत्ना 3000 तंबाखू केसरयुक्त विमल पानमसाला व्ही-1 तंबाखू बाबा नवरत्न पानमसाला, आर.आर. पानमसाला, रजनीगंधा पानमसाला प्रतिबंधित साठा किंमत: ₹2,59,560 वाहन किंमत: ₹6,00,000 एकूण मुद्देमाल ₹8,59,560 या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध:
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 20(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या 16 जुलै 2025 च्या अधिसूचनेनुसार हे पदार्थ प्रतिबंधित आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील प्रशिक्षणार्थी DYSP अक्षय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, उत्तम जाधव, रामहरी भोसले, यशवंत घुगे तसेच कासार शिरशी पोलीस ठाण्याचे सपोनि गर्जे, तपसे, नागमोडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा, विक्री किंवा वाहतूक हा गंभीर गुन्हा आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांविषयी नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
लातूर जिल्ह्यातील ही कारवाई केवळ तस्करीवर आळा घालणारी नाही, तर नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पोलिसांची बांधिलकीही दर्शवते. विशेष पथकाच्या सतर्कतेमुळे मोठा साठा जप्त करण्यात यश आले असून, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
"लातूरमध्ये गुटखा तस्करीवर मोठा प्रहार! पोलिसांच्या विशेष पथकाने ८.५९ लाखांचा साठा जप्त करत आरोपीला ठोकल्या बेड्या!"

Post a Comment
0 Comments