अंबादास करकरे
लातूर, दि. २१ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे उघडणारे आणि मोफत वैद्यकीय सेवा देणारे “देवमाणूस” म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना भाजप नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केली.
लातूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा, तसेच भाजपाचे माजी राज्यसभा सदस्य खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. अत्यंत शिस्तप्रिय व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले.
विविध भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना आ. कराड म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून “लातूर पॅटर्न” शिक्षण पद्धती विकसित केली, ज्याची राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.
शिक्षण क्षेत्रातील उंच व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. पाटील यांनी मुरूड परिसरासह इतर ग्रामीण भागात तब्बल १२ वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली. त्यामुळेच समाजात त्यांना “देवमाणूस” म्हणून मान मिळाला. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर मोलाचे योगदान दिले. उत्कृष्ट डॉक्टर व संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते.
डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने पाटील कुटुंबीयांना द्यावी, अशी प्रार्थना करत आ. रमेशअप्पा कराड यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment
0 Comments