Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


लातूर /अंबादास करकरे 

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दि. २३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९ वाजता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक लातूर जिल्ह्यात गस्त घालत होते. यावेळी रेनापुर फाटा ते रेणापूर मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार गुटखा वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित वाहन थांबवून तपासणी केली. कार चालक अमर श्रीमंत लकडे, वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर याला ताब्यात घेण्यात आले.

कारची झडती घेतली असता, विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला आणि रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा सुमारे २ लाख ३९ हजार ५८४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिजायर कार, किंमत सुमारे ६ लाख रुपये, जप्त करण्यात आली. एकूण ८ लाख ३९ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या प्रकरणी आरोपी अमर लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रेणापूर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे आणि प्रविण कोळसुरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments