लातूर/अंबादास करकरे
रेणापूर तालुक्यातील कारेपूर–सय्यदपूर–धवेली–कवठळी–आनंदवाडी या मार्गावरील सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी सायंकाळी सय्यदपूर येथे उत्साहात पार पडले. लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी केंद्र व राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना गती मिळाल्याचे सांगितले. “खरा विकास काय असतो, हे भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून दाखवून दिले,” असे ते म्हणाले. गेल्या पंधरा वर्षांच्या काँग्रेस कार्यकाळात विकासकामांचा अभाव होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम चप्पे होते. तसेच माजी आमदार त्रिंबकनाना भिसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवकन्या गोडभरले, रेणापूर पंचायत समिती सभापती सौ. मोनिका सूर्यवंशी, उपसभापती शरद दरेकर, रेणापूर नगराध्यक्षा शोभाताई अकनगिरे, जि.प. सदस्य महादेव साळुंके, पद्माकर चिंचोलकर, पं.स. सदस्या अंजली काळे, शितल राऊतराव, ओमप्रकाश गोडभरले, भागवत सोट, अनिल भिसे, सुरज शिंदे, सुकेश भंडारे, अॅड. दशरथ सरवदे, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कारेपूर ते आनंदवाडी हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून हा दर्जेदार डांबरी रस्ता उभारला जात असल्याचा आनंद असल्याचे आ. कराड यांनी व्यक्त केले. हा रस्ता १८ फूट रुंदीचा होणार असून वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचा शासनाचा निर्णय असून लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. पुढील दोन वर्षांत एकही शेतरस्ता शिल्लक राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अतिक्रमणे स्वखुशीने काढून रस्ते मोकळे करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
याशिवाय, घरकुल योजना, लाडकी बहीण योजना आणि इतर शासकीय योजनांमधून मोठ्या प्रमाणावर लाभ दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “आमदारकीचा उपयोग गोरगरीबांच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी करणे, हेच माझे भाग्य आहे,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात माजी आमदार त्रिंबकनाना भिसे यांनी, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व असल्याने विकासकामांना वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला. अनिल भिसे यांनीही मतदारसंघातील विकासाला गती मिळाल्याचे सांगितले. सभापती मोनिका सूर्यवंशी यांनी रेणापूर पंचायत समिती विकासाचे नवे मॉडेल उभे करेल, असे नमूद केले. उपसभापती शरद दरेकर यांनी १५ व्या वित्त आयोगातून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
प्रारंभी महेंद्र गोडभरले यांनी प्रस्ताविकातून रस्त्याच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले, तर मोहन बुड्डे यांनी आभार मानले. आ. रमेशअप्पा कराड यांच्या आगमनावेळी महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत पारंपरिक व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास सय्यदपूर, कारेपूर, धवेली, आनंदवाडी, कवठळी, खरोळा, रामवाडी, तळणी, मोहगाव आदी गावांतील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला-पुरुष व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments