Type Here to Get Search Results !

लातूर जिल्ह्यात गुटखा विरोधात धडक कारवाई; 8.97 लाखांचा मुद्देमाल जप्त, पण ‘58 हजारांवरच’ इतर कारवाया?



लातूर /अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत 8 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकाच दिवशी जिल्हाभर छापेमारी करून 11 गुन्हे दाखल करण्यात आले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अहमदपूर, रेणापूर, औसा, निलंगा, उदगीर, भादा, मुरुड, औराद शहाजनी आदी ठिकाणी एकाच वेळी कारवाया करण्यात आल्या.

रेणापूरमध्ये मोठा ‘कॅच’; एकट्याच कारवाईत 8.39 लाखांचा मुद्देमाल रेणापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आमर श्रीकांत लकडे याच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

जप्तीमध्ये- विमल पान मसाला – 24 बॅग, वी-1 तंबाखू – 24 बॅग (प्रति बॅग 52 पुडे) रजनीगंधा पान मसाला – 144 डबे, रत्ना 3000 सुगंधीत तंबाखू – 8 बॉक्स तसेच वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर (MH 44 G 2994) कार जप्त करण्यात आली. या एकाच कारवाईत तब्बल 8,39,584 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.

उरलेल्या 10 कारवाया फक्त 58 हजारांवर?

जिल्हाभरात एकूण 11 कारवाया झाल्या असताना, त्यापैकी एकट्या रेणापूर कारवाईत 8.39 लाखांचा मुद्देमाल जप्त.

तर उरलेल्या 10 कारवायांमध्ये मिळून फक्त सुमारे 58 हजार रुपयांची जप्ती झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या मोहिमेच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

या प्रकरणांमध्ये कोटपा अधिनियम 2003, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपींना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू आहे.

अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले की, “गुटखा व तंबाखूविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. समाजाच्या आरोग्याशी तडजोड होऊ देणार नाही.” अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी नागरिकांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील कारवाईवर नागरिकांचे थेट प्रश्न दरम्यान, या कारवाईनंतर लातूर शहरातील वास्तवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचा आरोप - शहरात खुलेआम गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री सुरूच पानपट्टी चालक बाहेरच्या राज्यातून माल आणत असल्याची चर्चा तरीही शहरात मोठ्या कारवाया क्वचितच

“मोठी कारवाई फक्त ग्रामीण भागापुरतीच का? शहरात कारवाई कमी का दिसते? उरलेल्या 10 कारवायांत इतकी कमी जप्ती कशी? काही नागरिकांनी तर उपरोधिक टीका करत म्हटले 

“मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर” या म्हणीप्रमाणे कारवाई होत असल्याचे चित्र दिसते. लातूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवून गुटखा व्यवसायावर धडक दिली असली, तरी आकडेवारीत दिसणारी तफावत आणि शहरातील स्थिती पाहता कारवाईची सातत्यता आणि समतोल अंमलबजावणी यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

आता पुढे पोलिसांची कारवाई खऱ्या अर्थाने सर्वत्र आणि समान पातळीवर होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments