लातूर /अंबादास करकरे
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख गोपी साठे यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी एक अनोखा आणि सकारात्मक उपक्रम राबवत गांधीगिरीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना जनजागृतीचा संदेश दिला. आज सकाळी उपक्रमाची सुरुवात महात्मा गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई या शहरातील प्रमुख मार्गावरील दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच फिरस्त्या विक्रेत्यांची भेट घेण्यात आली.
यावेळी गोपी साठे यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला गुलाबाचे फूल देत हात जोडून फूटपाथवरील अतिक्रमण स्वखुशीने काढून घेण्याची विनंती केली. तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण न करण्याचे आवाहनही करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी लागलेली १०० गुलाबाची फुले गोपी साठे यांनी स्वतःच्या खर्चातून खरेदी केली होती.
या अनोख्या उपक्रमाला व्यापारी व व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेकांनी तात्काळ अतिक्रमण हटविले असून पुन्हा अतिक्रमण करणार नाही तसेच इतरांनाही अतिक्रमण करू देणार नाही, असे आश्वासन दिले. परिणामी सध्या तरी या मार्गावरील फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे झाले आहेत.
याबाबत बोलताना गोपी साठे म्हणाले, “गांधीजींच्या विचारांनुसार संवाद आणि विनंतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही पुन्हा पुन्हा या परिसरात जाऊ, लोकांना समजावून सांगू आणि विनंती करू. तरीही नियमांचे पालन झाले नाही तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र लातूरकर नागरिक सजग असून कारवाईची वेळ येणार नाही, असा मला विश्वास आहे.”
अतिक्रमण हटविण्यासाठी दंडात्मक कारवाईऐवजी सौहार्द, संवाद आणि गांधीगिरीचा मार्ग अवलंबणाऱ्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


Post a Comment
0 Comments