अंबादास करकरे
उदगीर, दि. २ जून : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ लाख ८३ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर मंगल कार्यालयासमोरील रिंगरोड परिसरात, उदगीर शहराच्या दक्षिणेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. या वेळी आरोपी आदिनाथ बालाजी सिरस्कर (वय २६, रा. सिरस्कर गल्ली, पालम, जि. परभणी) याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पान मसाला, डीएच-१ तंबाखू, राजनिवास पान मसाला तसेच जाफरानी जर्दा के.एन. तंबाखू यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत ६३ हजार ६०० रुपये आहे. याशिवाय गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी होंडा कंपनीची आय-20 कार (क्र. MH-04-EH-4712) जप्त करण्यात आली असून वाहनाची किंमत सुमारे ३ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी नामदेव संतराम चेवले (पोलीस शिपाई, उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ३४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद २ जून २०२६ रोजी सकाळी ७.१६ वाजता करण्यात आली. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून त्यांची वाहतूक केल्याचा आरोप आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कैटे हे करीत आहेत.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments