Type Here to Get Search Results !

"मी तुकाराम मुंढे" मोहीम राबली तर प्रशासनात क्रांतिकारी बदल शक्य : सतीश तांदळे


अंबादास करकरे 

लातूर, दि. ४ : राज्यातील कर्तव्यदक्ष आणि नियमप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले माजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती आजही प्रशासनातील प्रामाणिकतेचे प्रतीक मानली जाते. त्यांच्या धाडसी आणि तडजोड न करणाऱ्या भूमिकेवर आधारित "मी तुकाराम मुंढे" ही संकल्पना राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारली, तर महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो, असे मत "माझं लातूर परिवार"चे सतीश तांदळे यांनी व्यक्त केले आहे.

सतीश तांदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या लेखात म्हटले आहे की, तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत कार्यालयात बसून फाईलींचा निपटारा करण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याला प्राधान्य दिले. नियमांची काटेकोर अंमलबजावणी, भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिका आणि राजकीय दबावाला न जुमानण्याची त्यांची कार्यशैली यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करू शकले.

त्यांच्या मते, राज्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशीच भूमिका घेतली तर अनेक वर्षे प्रलंबित राहणाऱ्या फाईलींचा वेगाने निपटारा होईल. ठेकेदारीतील कमिशन संस्कृतीला आळा बसेल, अधिकारी प्रत्यक्ष जनतेमध्ये दिसू लागतील आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढेल. आज "सर्व अधिकारी सारखेच असतात" अशी जनमानसातील धारणा बदलण्याची गरज असून, शंभर पैकी ऐंशी अधिकारी जरी प्रामाणिकपणे आणि नियमांनुसार काम करू लागले तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा दृढ होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

मात्र हा बदल सहज शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदल्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबीयांची जबाबदारी, राजकीय दबाव आणि विविध प्रकारच्या अडचणी यामुळे अनेक अधिकारी अशा भूमिकेपासून दूर राहतात. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.

तरीदेखील "मी तुकाराम मुंढे" ही मोहीम केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता तिच्यामागील मूल्ये आणि त्यासाठी लागणारी किंमत स्वीकारण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दाखवली, तर पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राच्या प्रशासनात लक्षणीय बदल दिसू शकतो, असा विश्वास सतीश तांदळे यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, आजच्या तरुण आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये व्यवस्थेला सकारात्मक दिशा देण्यासाठी आवश्यक धाडस आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी नमूद केले. एक सजग नागरिक म्हणून चांगल्या प्रशासनाचे स्वप्न पाहणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी लेखाचा शेवट "जय हिंद" या घोषणेने केला आहे.


Post a Comment

0 Comments