लातूर/अंबादास करकरे
देवणी, देवणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक मल्लिकार्जूनअप्पा मानकरी सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त संयोजन समितीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मल्लिकार्जूनअप्पा मानकरी सावकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान उपक्रमाची पाहणी करून आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने युवक व नागरिकांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्तदानासारखे महादान अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देणारे ठरत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या संयोजन समितीचे अभिनंदन केले. समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे असे उपक्रम प्रेरणादायी असून ही समाजसेवेची परंपरा भविष्यातही अविरत सुरू राहावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान व आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.

Post a Comment
0 Comments